ती जन्मली, कळी खुलली.
सृष्टी उमलली, हसू खेळू लागली.
अचानक वीज कडाडली, चिमुरडी घाबरली.
भीती घालवायला घट्ट मिठी मारायला तिचा बाप बनावं लागेल.
इवलीशी पावलं, शाळेचे कुतूहल.
अनोखे जग, असंख्य इच्छा.
बालहट्ट पुरवणारा तिचा बाप बनावं लागेल.
कॉलेजचे विश्व, आभासी दुनिया.
अल्लड वय, बेभान जोश.
सळसळते तारुण्य, घसरेल का पाय?
सावरण्यासाठी मित्राला तिचा बाप बनावं लागेल.
ती शिकली, प्रगती झाली.
घर सांभाळून नोकरीस चालली.
प्रतिभा खुले, नव क्षितिज मिळे.
प्रेरणा देण्यासाठी सहकाऱ्याला तिचा बाप बनावं लागेल.
राजकुमारी, पर घरची.
सासू, नंदा, जावा, आणाभाका.
पर मुलुख, परका वाडा.
मन राखायला नवऱ्याला तिचा बाप बनावं लागेल.
प्रांतवाद, जातीयता, भ्रष्टाचार.
ध्रुवीकरण, प्रदूषण, बलात्कार.
देशाभिमान? , एकता? , समता?
पुनर्वैभवास भारतभू च्या पुन्हा एकदा राष्ट्रपिता जन्मला पाहिजे.
ती थकली. मुलगी, मैत्रीण, सहकारी, सहचारिणी, आई, माता, आत्या, आजी.
थकलेल्या राजकुमाराची भंगू नये चिरशांती.
मानेखालच्या सरणाला तिचा बाप बनावं लागेल.
--- श्री. अविनाश कर्पे, देऊर.
९८५०२२२७५०
खूपच सुंदर विचार
ReplyDelete