महाशिवरात्रीनिमित्त वासोटा व नागेश्वर ट्रेकिंग (प्रवास वर्णन)

 ओम नमः शिवाय 

ओम नमः शिवाय

महाशिवरात्री म्हणजे थोडा हटकेच दिवस..आपले दैवत महादेव ही तसेच...निर्विकार... संन्यस्त ...आणि अलिप्त...

बऱ्यापैकी संसारात गुरफटून गेलेल्या कित्येकांना या निमित्ताने शांततेची आठवण होते...

गेले कित्येक दिवस साताऱ्यातील सर्वात दुर्गम भागातील वासोटा किल्ल्यावर जायचे मनात घोळत होते.दर वेळी काही न काही व्हायचेच..मग एकदाच ठरवून टाकलं महाशिवरात्री ला जायचं...किल्ले वासोटा व नागेश्वर देवस्थान...

काळव्यापात अधून मधून कोणी विचारले किंवा आठवले की शिवरात्री व वासोटा किल्ला समीकरण जुळवून ठेवलेलं...

शेवटी जसजशी शिवरात्री जवळ येऊ लागली.ट्रेकिंग ची तयारी पूर्ण  करायला घेतली.मागील पावनखिंड ट्रेकिंग चा अनुभव होताच त्यामुळं जे येतील, न येतील अशा सर्वांना मी जातोय हे कळवायची खबरदारी घेतली.त्यामुळे जाण्याजोगा छोटा ग्रुप सहज जमून गेला.अनेकांनी माहिती व अनुभव शेअर केले.

शेवटी एकदा 21 फेब्रुवारी 2020 महाशिवरात्री चा दिवस उजाडला.भल्या पहाटे न्याहरी बांधून सकाळी 6ला सातारा गाठला.व तेथून नियोजित गटामधून बामणोली ला जाण्यास निघालो.बामणोली ला पोहचे पर्यंत रेंज गायब झालेली.आणि बोटिंग साठी भली मोठी रांग पाहून थोडं बरे वाटलं ते अर्थातच की आपल्यासारखे शिवभक्त भरपूर  आहेत म्हणूनच..

पोहचल्यावर पहिल्यांदा पेटपूजा करून घेतली. *कारण आणलेली शिदोरी हातात वागवण्यापेक्षा पोटात वागवलेली बरी*---बौद्धिक पटण्याजोगे होते.

कसेंबसे गर्दीतून बोट मिळाली आणि वासोट्याचा प्रवास सुरु झाला. त्यात परत बौद्धिक मिळालं. *महाबळेश्वर तापोळ्या त  10 मिनिटे बोटीत फिरावायला जितके पैसे घेतात तेवढ्याच पैश्यात इथे जास्त  फिरायला मिळतेय*

मग काय पाणी, शेजारचे जंगल निरीक्षणास सुरुवात केली. जवळपास सव्वा तासाच्या प्रवासानंतर शेवटी एकदा वन विभागाच्या कार्यालयाजवळ पोहचलो.कमानी जवळ मस्त पैकी फोटोसेशन केले आणि जोशात असलेल्या गर्दीत मिसळून गेलो. अवघ्या वीसेक मिनिटात मारुती मंदिराजवळ पोहचलो. मंदिर अगदीच साधे गणपती व मारुतीच्या दोन मूर्ती..मंदिराजवळ दोन ओढ्यांचा संगम...
डावीकडे वळलो की वासोट्याला आणि उजवीकडे ओढ्यातून गेले की नागेश्वर...

बऱ्याच चौकशी अंती प्रथम नागेश्वर मार्गे जायचे ठरले.ओढ्यात सगळेच गोलगोल दगड गोटे भरलेले.उत्साहात उड्या मारत निघालो मात्र थोड्याच वेळात दगड गोट्याचा आकार व आक्रस्ताळेपणा त्रासदायक ठरू लागला. अगदीच जपून चालावे लागले. ओढ्यातील पाणी वाहने बंद झालेले मात्र ठिकठिकाणी पाणी साठून तयार झालेल्या डोहातील पाणी मात्र स्फटिकसारखे स्वच्छ होते. *निसर्गाचा अद्भुत वॉटर फिल्टर ...*

जसजसे पुढे जाऊ तसतसे ओढ्याचा आकार अजून अरुंद होऊ लागला व दगडांचा आकार वाढला.कधी कधी तर अशी वेळ यायची की भल्या मोठ्या दोन शिळांतून आपला इवलासा देह कसाबसा पार करावा लागे.

अचानक विचार मनात चमकला आपण ओढ्याच्या उगमाकडे जातोय... प्रवाहाच्या उलट दिशेने ..कदाचित धबधबा चढायला लागला तर...मनाला कल्पना मिळाली आणि अगदी तानाजी पासून बाहुबली ते नायगरा आणि ओझर्डे सगळे धबधबे आठवले आणि झालंही तसेच

 वळणावळणातून अचानक उंचच उंच कडा समोर ठाकला. आता मात्र पाणी आठवले. पाणी पिऊन थोडी उसंत घेऊन सुरुवात केली. आणि कडा सर केला. वाटेत अनेक ओळखीचे भेटत राहिले. सेल्फी , हस्तांदोलन होत राहिले. *कोरेगाव रनर्स ग्रुप चे सदस्य अधून मधून भेटत राहिल्याने मनोबल टिकून राहत होते*

कडा सर करताच नागेश्वराचा भव्य सुळका दिसला आणि त्यात मधोमध असलेले महादेवाचे पवित्र देवस्थान....

दर्शन घेऊन मस्त पैकी जेवून भटकंतीस सुरुवात केली. पलीकडच्या बाजूला खाली काही  गाड्या उभ्या दिसत होत्या. चौकशी केल्यावर समजले की तो भाग चिपळूण तालुक्यात येतो तिकडून नागेश्वराच्या पायथ्यापर्यंत रस्ता आहे. मात्र वर येण्यासाठी अतिशय खडा चढ असून लोखंडी शिड्या आहेत.

थोडी भटकंती केल्यावर आम्ही आमचा मोर्चा शेजारी च दिसणाऱ्या वासोटा किल्याकडे वळवला. नागेश्वर ते वासोटा मार्ग अतिशय अवघड पाऊलवाट आहे जी तीव्र कड्यावरून जाते.वासोट्याचा चढही अतिशय खडा असून या किल्ल्याचा वापर खूप वर्षे तुरुंग म्हणून केला जात असे.

किल्ल्यावरून खाली यायला कधी पायऱ्या तर कधी दगड मातीची वाट आहे..

खाली येतानाही आपल्या सहनशक्ती चा अंत पाहिला जातो.

कधी एकदाचे खाली उतरून येतो असे होते.
खाली उतरताच शिवसागराच्या थंडगार पाण्यात पाय बुडवून बसल्यावर स्वर्ग सुखाची जाणीव झाल्याशिवाय राहत नाही. 

अखेर परत एकदा शानदार बोटीमधून आपला परतीचा प्रवास  सुरू होतो. आणि पाठीमागे असलेला ऐतिहासिक वासोटा किल्ला मागे वळून वळून पाहिल्याशिवाय राहवत नाही..

कवितेच्या ओळीं आठवत राहतात .

*दिव्यत्वाची जेथे प्रचिती*
*तेथे कर माझे जुळती*

✍️✍️✍️
श्री अविनाश कर्पे, देऊर
9850222750
21 comments:

 1. खुप छान अनुभव आम्ही पण याच दिवशी घेतला

  ReplyDelete
 2. सुंदर प्रवासवर्णन

  ReplyDelete
 3. सुंदर प्रवासवर्णन केले आहे.

  ReplyDelete
 4. खूप छान वासोटा प्रवास

  ReplyDelete
 5. प्रवास वर्णन सुंदर केले आहे.

  ReplyDelete
 6. Very nice.
  प्रवासात सोबत होतो, खूप छान आठवण.

  ReplyDelete

तुमच्या बहुमूल्य प्रतिक्रियेसाठी आभारी आहे. धन्यवाद...